भारतीय शिक्षणव्यवस्था ही राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत पायाभरणी मानली जाते. कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रगतीचा पाया त्याच्या उच्च शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असतो. भारतात स्वातंत्र्यानंतर उच्च शिक्षणाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला; मात्र २१व्या शतकातील जागतिकीकरण, तंत्रज्ञानक्रांती, ज्ञानाधारित अर्थव्यवस्था आणि बदलत्या रोजगार बाजारपेठेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांची भूमिका अधिक व्यापक व बहुआयामी झाली आहे. पूर्वी महाविद्यालयांचे प्रमुख कार्य अध्यापन व पदवी प्रदान करणे इतकेच मर्यादित होते. परीक्षा-केंद्रित शिक्षणपद्धती, ठरावीक अभ्यासक्रम आणि पारंपरिक ज्ञानसंकल्पना यांवर भर दिला जात होता. परंतु आजच्या काळात महाविद्यालये केवळ ज्ञानप्रसाराची केंद्रे नसून संशोधन, नवोन्मेष, कौशल्यविकास, उद्योजकता प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी यांची केंद्रे म्हणून विकसित होत आहेत. विशेषतः राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मुळे उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तनाची दिशा निश्चित झाली आहे. या धोरणानुसार बहुविषयक शिक्षण, संशोधनाधिष्ठित अध्यापन, अकादमिक स्वायत्तता, कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षण यांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे महाविद्यालयांची शैक्षणिक भूमिका अधिक गतिशील, परिणामकारक आणि राष्ट्रविकासाभिमुख झाली आहे. भारतीय विकासाच्या दृष्टीने महाविद्यालयांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
प्रा. विशाल रामदास रोकडे (Fri,) studied this question.